फुले वेचण्याचा दिवस

माझी पहिली मराठी चित्तरकथा…….

मोठ्ठा वीकएण्ड. सोमवारी दसरा. तीन दिवस सुट्टी. “काका, शेतावर येणार का उद्या? आम्ही सगळे जातो आहोत. झेंडू फुललाय.” शुक्रवारी संध्याकाळी मेघ्याने ललकारले.

मेघराज, मेघ्याच खरतर, आमच्या पलीकडच्या सोसायटीत राहतो. त्याची व आमची सदनिका अगदी समोरासमोर. अगदी खोलीसमोर खोली आणि खिडकी समोर खिडकी. ती सुध्हा फ़्रेन्च विंडो, भलीमोठ्ठी. फोन सोडा, वॉचमनची सुध्हा जरूरी नाही आमच्या घरांना. आमच्या समोरासमोर गप्पा सुरु झाल्या की दोन्ही सोसयट्यातील टीवी एकतर बंद तरी होतात नाहीतर जोरात वाजू लागतात. असो.

मेघ्या कंप्युटरच्या क्षेत्रामधील. पण त्याने शेती करायचे मनावर घेतले आणि आणखी दोन मित्रांना बरोबर घेऊन एक शेतच खरेदी केले. आठवडाभर शेतावर कामगार असतात पण दर वीकएण्डला स्वतः जाऊन राबतो. या वेळी झेंडू लावला होता. शंभर एक किलो पीक आले होते. दोन दिवसात फुले खुडणे आवश्यक होते. मेघ्या तोडणी कामगार गोळा करत होता. तीन्ही मित्रांचे आई-वडिल खुशीने तयार होते. मी केवळ फोटो काढणार या अटीवर जाण्याचे मान्य केले.


शेत पुण्याजवळ पारगाव-खन्डाळा येथे आहे. एका तासाचा ड्राईव्ह एन एच ४ वरून. तीन गाडया भरून तोडणी कामगार सकाळी पुण्याच्या ६ वा निघाले. घडयाळाचा काटा चुकून ६.३०/ ६.४५ अशी काहीतरी वेळ दाखवत होता. मुंबईचे घडयाळ ते, अजून पुण्याला सरावले नव्हते. वीकएण्डला ब्रेकफास्ट म्हणजे हिन्दुस्तानचे पॅटीस, इडली किंवा तत्सम जे काही वाण्याकडे तयार मिळेल ते. पण पुण्याच्या वाण्याचे ६:०० मुंबईच्या घडयाळातील ८:०० वाजता उजाडतात. थोडक्यात, तोडणी कामगारांची रिकामी पोटे कात्रजचा बोगदा ओलांडल्यावर गाडीपेक्षा जास्त आवाज करू लागली होती.

मग मेघ्याने पहिला हाल्ट खोपडेमामांच्या टपरीवर लावला. स्टोव्हचा आवाज, चहाची उकळ, मिसळीच्या कटाचा झणझणित वास, भजीचा काढलेला पहिला घाणा, बटाटवडा तळण्याच्या पूर्ण तयारीत असलेल्या मामी, अशा अतिशय उत्साहवर्धक दृष्य-गंधाच्या दुनियेची चाहुल लागताच गाडीतील सर्व कामगार एकदम फ्रेश दिसू लागले व पटापट खाली उतरले. “या या” मामांनी अतिशय प्रेमाने स्वागत केले. मेघ्या त्यांचा नेहमिचा पावणा होता व आता तर भोवानीलाच उगवला होता. “तरीच मी म्हणत होते की हा सकाळी मला न उठवता चहादेखिल न घेता कसा जातो शेतावर” मेघ्याची आई पुटपुटली. बाकीच्या आयांनी त्याला सहमतीदर्शक माना डोलावल्या. सगळ्या बाबांच्या मुखावर एक छद्मी स्मितरेषा उमटून गेली. पण मिसळ, भजी, वडा व मग गोडुस चहा असा नाश्ता सर्वांनीच हाणला. मिसळ तर एकदम तुफान होती. गरम गरम जळजळीत कटामुळे चव फारशी कळली नाही तरीही किक मात्र जबरदस्त बसली. शेत आता फक्त ५ कि.मि. वर होते.

हायवे सोडून गावाच्या रस्त्याला लागलो. थोड्याच अंतरावर डांबरी रस्ता संपून मातीचा रस्ता सुरू झाला. दूरवर सुर्यफुलांची छोटीशी लागवड केलेली दिसली. मग मातीही गेली व दगड दिसू लागले. गाडया अनोळखी आवाज करू लागल्या. तेवढयात समोर एक घर दिसले. मेघ्या म्हणाला “हे आपले पार्किंग. त्या बैलगाडी जवळ पार्क करा. आता यापुढे दोन किलोमिटर वर आपले शेत”.

तोडणी कामगार पायवाटेने भराभरा शेताकडॆ चालू लागले. मी आपला कॅमेरा गळ्यात अडकवून हळूहळू इकडॆतिकडॆ बघत पुढे सरकू लागलो. बाजूला गवताच्या गंजी लावल्या होत्या. जवळच एक गाय व तिचे वासरू अगदी निवांत चरत होते. हवेत एक धुन्द करणारा मोकळेपणा होता.

पायवाटेच्या दोन्ही बाजूंना हिरवेगार गवत, (कारळ्याची?) पिवळी फुले, कसलीतरी रानटी कणसे व सुन्दर तुरे दिसत होते.

असे आणखी थोडे पुढे गेल्यावर झेंडूची लागवड दिसू लागली. लोक भराभरा फुले वेचू लागले होते.

मी आपला फोटो काढत होतो. मग मला कोणीतरी नर झेंडू व मादी झेंडू असा फरक समजावून दिला. खरे खोटे कोण जाणे. दोन प्रकार मात्र वेगळे दिसत होते.

नर झेंडू Male Marigold
नर झेंडू Male Marigold
मादी झेंडू Female Marigold
मादी झेंडू Female Marigold
शेताच्या मधोमध एक झाड होते त्यावर मला बयेची घरटी दिसली. पाखरे मात्र नव्हती.
आता ऊन्हे वर आली होती. फोटो करपवत होती. बाजुलाच एक पक्के घर बांधले होते. मी माझा मोर्चा तिकडे वळवला. घरात ५-६ छान शॉट मिळाले. ट्रायपॉड नाही याचे इतक्या वर्षात पहिल्यांदा दुःख झाले. लो-लाईट मधे फोटो काढतांना त्रास झाला. सपोर्ट घेतला तरी थोडा शेक आलाच फोटोत. असो.
The ubuquitous power meter
Grinding Stone with carving on it
Bedroom cum Store room
Dressing Table
Kitchen Shelf
फुलांच्या जोडीने मिर्ची टोमॅटो देखिल खुडुन झाले. फुलेही काढून झाली होती. १०० एक किलो जमली. आतापावेतो १:०० वाजला होता. हा पोटाचा १:०० होता त्यामुळे येथे घडयाळाचा काही संबंध नव्हता. आम्ही बरोबर नेलेले उपमा वगैरे खाऊ लागलो, तेवढयात गावातून चुलीवर भाजलेली भाकरी, लाल रस्सा असलेली उसळ असे खास जेवण आले. सर्व घामेजलेले भुकेले कामगार त्यावर तुटून पडले.

शेतापासून १५ मिनिटांच्या अंतरावर एक तळे आहे. तेथे दुपारी ऊन झाले की गारव्यासाठी ससे, हरणे, कोल्हे, रानडुकरे इत्यादी प्राणी येतात तेथे फोटो सेशन साठी जाण्याचा प्लॅन होता. पण आता तुडुंब भरलेल्या पोटाने व जडावलेल्या देहाने असहकार पुकारला. तेंव्हा पुन्हा परत येण्याचा वादा करून आम्ही झेंडूंनी भरलेल्या गाडया पुण्याकडे वळविल्या.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s