“चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो”…….
गीतकार साहिर. गायक महेन्द्र कपूर. चित्रपट गुमराह.
मला आठवते तेंव्हापासून गाण्याची ही पहिली ओळ मला तुफान आवडते. या ओळीचे शुद्ध भाषांतर म्हणजे “चला पुन्हा एकदा एकमेकांना अनोळखी होऊया”. चित्रपटात “आपण एकमेकांना विसरून जाऊया” याच अर्थाने ही ओळ वापरली गेली असावी. पण माझ्या मनात भरलेले भावांतर मात्र वेगळेच आहे. ते आहे “चला पुन्हा एकदा एकमेकांची जुनी ओळख विसरून नवी ओळख करून घेऊया”. उर्दू शब्दांना अनेक छटा असतात. अजनबी या शब्दाची एक छटा म्हणजे नविन, नवपरिचीत, पूर्वपरिचितच्या विरुद्धार्थी.
परिचित, ओळखीचे म्हणजे तरी काय? आपले पूर्वानुभव, पूर्वग्रह व आठवणी. त्यावर आधारीत पुढे काय होईल किंवा समोरचा माणूस पुढे कसा वागेल याबद्दलचे आपले अंदाज. बहुतांशी समोरच्याचे वागणे आपण आपल्या पूर्वग्रहांच्या चष्म्यातूनच पहात असतो. नवपरिचित व्यक्ती जेंव्हा परिचित होत असते तेंव्हा हे काही नसते. आपण फक्त कुतुहलाने निरिक्षण करीत असतो. समोरील व्यक्तिमत्वाचे पैलू फक्त जाणून घेत असतो. आपल्या अंदाजांचा चष्मा अजून तयार झाला नसतो. पण थोडी जान-पहचान वाढली कि वाटते समोरचा माणूस मला समजला. असे वाटू लागले कि आपला चष्मा झालाच तयार. मग संबंध जितके जास्त वाढतात तितका चष्म्याचा रंग अधिक गडद होत जातो.
अरे, आपण स्वतःलाच अजून ओळखलेले नसते तर समोरच्याला कसे ओळखणार? मग आपण हा चष्मा तयारच केला नाही तर? तर आपल्या प्रतिक्रिया तरी पूर्वग्रहदूषित नसतील. समोरील व्यक्तिमत्वाचे अधिकाधिक पैलू आपल्या नजरेस जसेच्या तसे पडतील. पूर्वी बोचलेल्या कंगोर्यांना परिस्थितीच्या दगडावर घासून नियती त्यांचे पैलूंमध्ये रुपांतर करते आहे हे जाणवू लागेल व त्यांचा गहिरा रंग आता मनाला अधिकच भुरळ पाडेल. सर्वात महत्वाचे म्हणजे, येणारा प्रत्येक क्षण आपल्याला जसा आहे तसा अनुभवता येईल. हो कि नाही? आणि म्हणूनच
“चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये …….” .
मला पहिली ओळ जेवढी आवडते तेव्हढाच आवडतो त्या नज़्मचा शेवट –
वो अफसाना जिसे अंजामतक लाना न हो मुमकिन
उसे एक खूबसुरत मोड देके छोडना अच्छा
आकांक्षा असणे, जीवनात अपेक्षा ठेवणे हे मनुष्यस्वभावाला स्वाभाविक आहे. पण त्या पूर्ण होणे हे सर्वस्वी त्याच्या हातात नसते. ती नियती असते ना, ती स्वतःचेच खरे करत असते. माणसाच्या हातात शुद्ध हेतुसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे येवढेच असते. “मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला” याचा आनंद मात्र फक्त त्याचाच असतो. तो काही नियती हिरावून घेऊ शकत नाही. मग जे मनोदय पूर्ण होत नाहीत त्याबद्दल कटु आठवणी बाळगण्याचे कारण काय? आणी जे होतात ते तरी लक्षात कशाला ठेवायचे? आपल्या हक्काचा आनंद मिळाला कि त्या सुंदर वळणावर आत्तापर्यन्त केलेल्या कष्टांना व बाळगलेल्या त्या आशा-आकांक्षांनाही म्हणावे,
“चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये …….” .