वाघाची पावले

मध्यप्रदेशातील बांधवगड हे वाघांचे अभयारण्य आहे. उन्हाळ्यामध्ये वाघ सहज दिसतात कारण ते पाण्याच्या ठिकाणी वारंवार येतात व पाण्याची ठिकाणे फार मर्यादित झालेली असतात. हिवाळ्यात वाघ दिसणे त्यामानाने अवघड असते कारण भरपूर थंडीमुळे वाघ झाडीतच रहाणे पसंत करतो व पाणीही बर्‍याच ठिकाणी असते. आम्ही जानेवारीत बांधवगडला गेलो होतो. त्यामुळे वाघ दिसणार नाहीत याची पूर्ण कल्पना होती. पण वाघ दिसावा व कॅमेर्‍यात टिपावा अशी जबरदस्त इच्छा तर होती. 

 

सफारीची सुरुवात भल्या भल्या पहाटे चार-पाच अंश सेल्सिअस तापमानात सुरू झाली. जंगलखात्याचा वाटाडया माहीती देत होता. काल अमुक येथे वाघ दिसला. या जंगलात इतके वाघ आहेत. या वाटेवर एक वाघीण व तिची चार पिले आहेत इ. इ.

आम्ही आजूबाजूची हरणे, चितळ, सांबर कॅमेरामधे टिपण्यात गुंग होतो. येवढयात समोरून एक जीप जोरात आली व जवळ येऊन थांबली. त्या जीपच्या वाटाडयाने ती वाघीण व तिचे बछडे रस्ता ओलांडून बाजूच्या झाडीत शिरताना पाहीले होते. आम्हाला ते दिसले का असे त्याने विचारले.

आम्ही नाही म्हणताच ते वाघ अजून झाडीतच होते असे सरळच अनुमान निघत होते. लगेच दोन्ही जीप वेगाने जिथे वाघ आत जाताना दिसले होते तेथे जाऊन थांबल्या.

रस्त्याचा कडेला मातीमध्ये वाघांच्या पावलांचे ताजे ठसे दिसत होतेच. तेव्हडयात समोरच्या झाडीत खुसुखुसू झाले आणी आमच्या जीपमधील एकाला वाघाचे डोके अंधुकसे दिसते आहे असे वाटले. बाकी कोणालाच काही दिसले नाही.

तो पर्यंत मागे आणखी एक दोन जीप येऊन लागल्या होत्या. अर्धा पाऊण तास थांबूनसुद्धा वाघाचे दर्शन काही झाले नाही. आता सांबाराचे कॉल (चित्कार) लांबून ऐकू आले व मग लांबवर ते सांबर जीव घेऊन पळतांना दिसले. म्हणजे वाघ नक्की लांब गेल्याची खूण होती. तेंव्हा आम्ही नुसत्या पावलांच्या ठश्यांवर समाधान मानून तेथून निघालो. 

त्या पळणार्‍या जीवाला बघताना सहज मनात आले कि आम्हीही त्या वाघांच्या तेव्हढेच जवळ होतो. समजा झालेच असते आमने सामने तर? तर आम्हा फोटोग्राफर लोकांना तर अत्यानंदच झाला असता. आम्ही काही पळालो नसतो. वाघ टिपायला तर आलो होतो. केंव्हापासून कॅमेरे सज्ज ठेवुन बसलो होतो. 

थोडे पुढे गेलो व आमच्या जीपचा एक टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी आम्हाला खाली उतरवणे भाग होते. नाहीतर जंगलात जीपच्या खाली उतरूच देत नाहीत. आता आमचा वाटाडया भयंकर टेन्स झाला. आम्ही जंगलाचे फोटो काढण्यास आजूबाजूला जाऊ लागलो कि आम्हाला धरून जीपच्या जवळ आणत होता. पुन्हा पुन्हा सांगत होता की आसपास वाघ आहेत, अजिबात कोठे हलू नका. 

क्षणात मनात आले, मगाशी जीपच्या जीवावर गमजा मारत होतो कि वाघ समोर आला पाहिजे होता. फोटो मिळाला नाही म्हणुन हळहळत होतो. आता वाघ समोर आला व अंगावर चालून आला तर? त्या सांबारासारखे पळता येणे शक्य नाही. मग, वाघाच्या तोंडी जाणे हा एकच मार्ग शिल्लक आहे हे कळल्यानंतरसुद्धा तोंडी जाता जाता त्याचे फोटो काढणे येवढी बांधिलकी तरी आपली फोटोग्राफीशी आहे का? फोटो काढताना त्या पाणिनीसारखे आम्हाला तल्लिन होता येईल का? 

पाणिनी हा इ.स.पूर्व आठव्या शतकात संस्कृत भाषेचा व्याकरणकार होऊन गेला. त्याने ऋग्वेदाची पुन:रचना केली, तसेच व्याकरणाचे संस्कृत भाषेचे नियम चौकटबद्ध केले. ‘व्याघ्र’ ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल असा विचार करत असताना नेमका त्याला सावधपणे माग हुंगत येणारा वाघ दिसला आणि त्याला व्याघ्र का म्हणतात याचा उलगडा त्याला झाला. त्या आनंदात तल्लिन होऊन “व्याजिघ्रति इति व्याघ्रः”  अशी रचना करत असतानाच त्यास वाघाने खाल्ले. अशी पाणिनीच्या मृत्यूची दंतकथा आहे. 

आणी मी स्वतःलाच टोकले “काय हौशी फोटोग्राफर, आहे का आपली येवढी कमिटमेन्ट?”

अग्निपंखी

फ्लॅमिंगो या पक्ष्याचे रोहित हे आपल्याकडचे प्रचलित नाव आहे. अग्निपंखी हे त्यामानाने कमी प्रचलित नाव. पण मला अग्निपंखी हेच नाव जास्त योग्य वाटते. का हे यापुढील फोटोमुळे कळेलच.

रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत विशिष्ट असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतीशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत. भिगवण जवळचे डिक्सळ हे गाव उजनी जलशयाच्या काठावर आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च या महिन्यात येथे रोहित पक्षी वस्तीला येतात.

या “अग्निपंखीं”च्या फोटोग्राफीसाठी केलेल्या प्रवासाचे हे चित्रवर्णन. या आधी खूप जणांनी केले आहे. मीही त्यातलाच आणखी एक. परंतु अग्निपंखीची जलक्रीडा व गगनविहार हा एक अवर्णनीय अनुभव असल्याने चित्रे जास्त व वर्णन आवश्यक तेव्हढेच ठेवणार आहे.

डिक्सळला नावाडयाशी भाव ठरवून (साधारण प्रती माणशी १००-२०० रुपये १-२ तासांसाठी) होडीने प्रयाण करेपर्यंत सूर्य बराच वर आला होता.  नावाडयाने लांब हात करून सांगितले की पक्षी या वेळी फार लांब आहेत. त्या झाडाच्याही पलिकडल्या किनार्‍यावर.

थोडयावेळाने लांबवरून येणारा एक ४०-५० रोहित पक्ष्यांचा थवा डोक्यावरून उडत गेला. नावाडी म्हणाला कि पुढे गेलेल्या काही लोकांनी आवाज करून यांना उडवले असणार. नाहीतर येवढे एकदम उडत नाहीत.

साधारण २०-२५ मिनिटे गेल्यावर आम्ही त्या जलाशयाच्या मध्येच असलेल्या एका झाडापाशी पोहोचलो. तेथून बर्‍याच लांब अंतरावर रोहीतांचा एक थवा पाण्यात जलक्रीडा करतांना दिसत होता. आजूबाजूस दोन-तीन इतर होडयाही होत्या. पण कोणताही नावाडी होडी आणखी पुढे नेण्यास तयार नव्हता. यापुढे होडी नेली तर त्या हालचालीने पक्षी पुन्हा उडून पलीकडे लांब जातील असे त्यांचे म्हणणे होते.

येवढया लांब अंतरावरून फोटो काढण्यास २५०मि.मि. रेंजची लेन्सही कमीच पडते. ३००-४०० मि.मि. तरी हवी. माझी लेन्स २०० मि.मि. ची असल्याने फोटो काढण्यावर साहजीकच मर्य़ादा पडल्या.

सकाळच्या न्याहारीत गुंतलेला हा एक थवा.


प्रणय नृत्यात दंग असलेला अग्निपंखी.

असे आम्ही रोहित दर्शनात गुंग होतो तेव्हडयात एका नावाडयाने त्याची होडी पुढे दामटली.

ती हालचाल पहाताच थव्यातील काही पक्षी पुन्हा आकाशात उडाले. त्यांनी आमच्या डोक्यावरून एक लहानशी फेरी मारली त्याचे काही फोटॊ आता पुढे येतील. पक्षी उडालेले पाहून इतर नावाडयांनी त्या पुढे जाणार्‍या नावाडयाला रोखले. पण तो पर्यंत मला अग्निपंखींच्या गगनविहाराचे छान फोटो मिळाले.

असा साधारण एक तास रोहीत निरीक्षणात काढून आम्ही परत फिरलो, पण पुन्हा पुढल्या वर्षी जास्त चांगली रेंज असलेली लेन्स घेऊन येण्याचा निश्चय करुनच.


एक झाड आणी…….

पुण्याजवळील भिगवण हे पक्षीप्रेमी लोकांमध्ये अतिशय प्रसिध्द गाव. तेथे काढलेला हा फोटो. तो पहाता पहाता “एक झाड आणी दोन पक्षी” असे शीर्षक एकदम डोळ्यांपुढे आले. 

संस्कृतमधील एका श्लोकामध्ये देह, मन व आत्मा यांचे वर्णन “एक झाड आणी दोन पक्षी” असे केले आहे. एक झाड म्हणजे आपण स्वत: आणि दोन पक्षी म्हणजे आपले मन व आत्मा. त्या श्लोकामध्ये पुढे असे वर्णन आहे की आयुष्याच्या झाडावरती असलेले हे दोन पक्षी. एक (म्हणजे मन) सर्व फळे खातो पण तरीही दु:खी व असमाधानी आहे.  दुसरा (म्हणजे आत्मा) काहीही खात नाही आणी सतत शांतपणे पहिल्याचे निरिक्षण करतो. 

जर वरील फोटोला हे शीर्षक दिले तर मग या खालच्या फोटोला काय शीर्षक द्यावे? येथे तर दोन्हीही पक्षी एकमेकांकडे पाठ फिरवून बसले आहेत. 

मला वाटते पहिल्या फोटोला “एक झाड आणी दोन पक्षी (कलियुगापूर्व्रीचे)” व दुसर्‍याला “एक झाड आणी दोन पक्षी (कलियुगातील)” म्हणावे. कलियुगातील मन फार हुशार झाले आहे. आपल्या सर्व वासनांना त्याने येवढे सोज्वळ रूप दिले आहे कि जणू प्रतिआत्माच. आणी तो आत्मा बिचारा शोधतोय की तीन युगे निरिक्षण केलेले ते काळेकुट्ट, सतत फडफडणारे मन गेले तरी कुठे?