फ्लॅमिंगो या पक्ष्याचे रोहित हे आपल्याकडचे प्रचलित नाव आहे. अग्निपंखी हे त्यामानाने कमी प्रचलित नाव. पण मला अग्निपंखी हेच नाव जास्त योग्य वाटते. का हे यापुढील फोटोमुळे कळेलच.
रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत विशिष्ट असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतीशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत. भिगवण जवळचे डिक्सळ हे गाव उजनी जलशयाच्या काठावर आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च या महिन्यात येथे रोहित पक्षी वस्तीला येतात.
या “अग्निपंखीं”च्या फोटोग्राफीसाठी केलेल्या प्रवासाचे हे चित्रवर्णन. या आधी खूप जणांनी केले आहे. मीही त्यातलाच आणखी एक. परंतु अग्निपंखीची जलक्रीडा व गगनविहार हा एक अवर्णनीय अनुभव असल्याने चित्रे जास्त व वर्णन आवश्यक तेव्हढेच ठेवणार आहे.
डिक्सळला नावाडयाशी भाव ठरवून (साधारण प्रती माणशी १००-२०० रुपये १-२ तासांसाठी) होडीने प्रयाण करेपर्यंत सूर्य बराच वर आला होता. नावाडयाने लांब हात करून सांगितले की पक्षी या वेळी फार लांब आहेत. त्या झाडाच्याही पलिकडल्या किनार्यावर.
थोडयावेळाने लांबवरून येणारा एक ४०-५० रोहित पक्ष्यांचा थवा डोक्यावरून उडत गेला. नावाडी म्हणाला कि पुढे गेलेल्या काही लोकांनी आवाज करून यांना उडवले असणार. नाहीतर येवढे एकदम उडत नाहीत.
साधारण २०-२५ मिनिटे गेल्यावर आम्ही त्या जलाशयाच्या मध्येच असलेल्या एका झाडापाशी पोहोचलो. तेथून बर्याच लांब अंतरावर रोहीतांचा एक थवा पाण्यात जलक्रीडा करतांना दिसत होता. आजूबाजूस दोन-तीन इतर होडयाही होत्या. पण कोणताही नावाडी होडी आणखी पुढे नेण्यास तयार नव्हता. यापुढे होडी नेली तर त्या हालचालीने पक्षी पुन्हा उडून पलीकडे लांब जातील असे त्यांचे म्हणणे होते.
येवढया लांब अंतरावरून फोटो काढण्यास २५०मि.मि. रेंजची लेन्सही कमीच पडते. ३००-४०० मि.मि. तरी हवी. माझी लेन्स २०० मि.मि. ची असल्याने फोटो काढण्यावर साहजीकच मर्य़ादा पडल्या.
सकाळच्या न्याहारीत गुंतलेला हा एक थवा.
प्रणय नृत्यात दंग असलेला अग्निपंखी.
असे आम्ही रोहित दर्शनात गुंग होतो तेव्हडयात एका नावाडयाने त्याची होडी पुढे दामटली.
ती हालचाल पहाताच थव्यातील काही पक्षी पुन्हा आकाशात उडाले. त्यांनी आमच्या डोक्यावरून एक लहानशी फेरी मारली त्याचे काही फोटॊ आता पुढे येतील. पक्षी उडालेले पाहून इतर नावाडयांनी त्या पुढे जाणार्या नावाडयाला रोखले. पण तो पर्यंत मला अग्निपंखींच्या गगनविहाराचे छान फोटो मिळाले.
असा साधारण एक तास रोहीत निरीक्षणात काढून आम्ही परत फिरलो, पण पुन्हा पुढल्या वर्षी जास्त चांगली रेंज असलेली लेन्स घेऊन येण्याचा निश्चय करुनच.
फारच सुंदर. तुमचे फोटोच इतके सुंदर आहेत की लिहिलेला वाचायला फार प्रयत्न करावा लागला. खूप सुंदर. 🙂
सुंदर फोटो…..