मध्यप्रदेशातील बांधवगड हे वाघांचे अभयारण्य आहे. उन्हाळ्यामध्ये वाघ सहज दिसतात कारण ते पाण्याच्या ठिकाणी वारंवार येतात व पाण्याची ठिकाणे फार मर्यादित झालेली असतात. हिवाळ्यात वाघ दिसणे त्यामानाने अवघड असते कारण भरपूर थंडीमुळे वाघ झाडीतच रहाणे पसंत करतो व पाणीही बर्याच ठिकाणी असते. आम्ही जानेवारीत बांधवगडला गेलो होतो. त्यामुळे वाघ दिसणार नाहीत याची पूर्ण कल्पना होती. पण वाघ दिसावा व कॅमेर्यात टिपावा अशी जबरदस्त इच्छा तर होती.
सफारीची सुरुवात भल्या भल्या पहाटे चार-पाच अंश सेल्सिअस तापमानात सुरू झाली. जंगलखात्याचा वाटाडया माहीती देत होता. काल अमुक येथे वाघ दिसला. या जंगलात इतके वाघ आहेत. या वाटेवर एक वाघीण व तिची चार पिले आहेत इ. इ.
आम्ही आजूबाजूची हरणे, चितळ, सांबर कॅमेरामधे टिपण्यात गुंग होतो. येवढयात समोरून एक जीप जोरात आली व जवळ येऊन थांबली. त्या जीपच्या वाटाडयाने ती वाघीण व तिचे बछडे रस्ता ओलांडून बाजूच्या झाडीत शिरताना पाहीले होते. आम्हाला ते दिसले का असे त्याने विचारले.
आम्ही नाही म्हणताच ते वाघ अजून झाडीतच होते असे सरळच अनुमान निघत होते. लगेच दोन्ही जीप वेगाने जिथे वाघ आत जाताना दिसले होते तेथे जाऊन थांबल्या.
रस्त्याचा कडेला मातीमध्ये वाघांच्या पावलांचे ताजे ठसे दिसत होतेच. तेव्हडयात समोरच्या झाडीत खुसुखुसू झाले आणी आमच्या जीपमधील एकाला वाघाचे डोके अंधुकसे दिसते आहे असे वाटले. बाकी कोणालाच काही दिसले नाही.
तो पर्यंत मागे आणखी एक दोन जीप येऊन लागल्या होत्या. अर्धा पाऊण तास थांबूनसुद्धा वाघाचे दर्शन काही झाले नाही. आता सांबाराचे कॉल (चित्कार) लांबून ऐकू आले व मग लांबवर ते सांबर जीव घेऊन पळतांना दिसले. म्हणजे वाघ नक्की लांब गेल्याची खूण होती. तेंव्हा आम्ही नुसत्या पावलांच्या ठश्यांवर समाधान मानून तेथून निघालो.
त्या पळणार्या जीवाला बघताना सहज मनात आले कि आम्हीही त्या वाघांच्या तेव्हढेच जवळ होतो. समजा झालेच असते आमने सामने तर? तर आम्हा फोटोग्राफर लोकांना तर अत्यानंदच झाला असता. आम्ही काही पळालो नसतो. वाघ टिपायला तर आलो होतो. केंव्हापासून कॅमेरे सज्ज ठेवुन बसलो होतो.
थोडे पुढे गेलो व आमच्या जीपचा एक टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी आम्हाला खाली उतरवणे भाग होते. नाहीतर जंगलात जीपच्या खाली उतरूच देत नाहीत. आता आमचा वाटाडया भयंकर टेन्स झाला. आम्ही जंगलाचे फोटो काढण्यास आजूबाजूला जाऊ लागलो कि आम्हाला धरून जीपच्या जवळ आणत होता. पुन्हा पुन्हा सांगत होता की आसपास वाघ आहेत, अजिबात कोठे हलू नका.
क्षणात मनात आले, मगाशी जीपच्या जीवावर गमजा मारत होतो कि वाघ समोर आला पाहिजे होता. फोटो मिळाला नाही म्हणुन हळहळत होतो. आता वाघ समोर आला व अंगावर चालून आला तर? त्या सांबारासारखे पळता येणे शक्य नाही. मग, वाघाच्या तोंडी जाणे हा एकच मार्ग शिल्लक आहे हे कळल्यानंतरसुद्धा तोंडी जाता जाता त्याचे फोटो काढणे येवढी बांधिलकी तरी आपली फोटोग्राफीशी आहे का? फोटो काढताना त्या पाणिनीसारखे आम्हाला तल्लिन होता येईल का?
पाणिनी हा इ.स.पूर्व आठव्या शतकात संस्कृत भाषेचा व्याकरणकार होऊन गेला. त्याने ऋग्वेदाची पुन:रचना केली, तसेच व्याकरणाचे संस्कृत भाषेचे नियम चौकटबद्ध केले. ‘व्याघ्र’ ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल असा विचार करत असताना नेमका त्याला सावधपणे माग हुंगत येणारा वाघ दिसला आणि त्याला व्याघ्र का म्हणतात याचा उलगडा त्याला झाला. त्या आनंदात तल्लिन होऊन “व्याजिघ्रति इति व्याघ्रः” अशी रचना करत असतानाच त्यास वाघाने खाल्ले. अशी पाणिनीच्या मृत्यूची दंतकथा आहे.
आणी मी स्वतःलाच टोकले “काय हौशी फोटोग्राफर, आहे का आपली येवढी कमिटमेन्ट?”
amazing photography!!!!!!!!!