पुण्याजवळच्या पौड गावाकडे जाताना हा फोटो काढला. सूर्योदयापूर्वीची वेळ होती. रस्त्यावर अजून धुके होते. समोरुन शाळेत निघालेली ही मुले दिसली. बाकी गणवेष पूर्ण परंतू अनवाणी. चेहरे मात्र ताजेतवाने. हे सर्व वातावरण माझ्या मनाला माझ्या शाळेच्या दिवसात घेऊन गेले.
दिवाळीची सुट्टी झाली कि लगेच आजोबा आम्हा भावंडांना घेऊन गावाला जायचे. शहरी शाळांना सुट्टी लागली तरी गावाकडच्या शाळा मात्र एकदोन आठवडे जास्त चालू असत. त्यांना म्हणे पावसाळ्यात जास्त सुट्टी असे व दिवाळीत कमी. सकाळी अशीच मस्त थंडी व धुके असे. लाकडे पेटवून घंगाळात गरम केलेल्या पाण्याने आंघोळ झाली कि मग लगेच न्याहारी चुलीवरच्या पिठलं-भाकरीची. शहरात गळ्याखाली न उतरणारी गँस वर केलेली भाकरी गावाला चुलीवरुन उतरली की कधी पोटात पोचते हे कळायचे देखील नाही. पिठल्यासारखे दुसरे पक्वान्न जगात दुसरे कुठले असूच शकत नाही याची पुन्हा एकदा खात्री व्हायची. मग भावंडांची शाळेत निघण्याची लगबग सुरू होत असे. चुलत भावंडे सकाळी शाळेत निघाली की आम्हीसुद्धा उडया मारत त्यांच्या बरोबर शाळेपर्यंत एक-दोन किलोमीटर जात असू. ते अनवाणी निघाले की आम्हालाही चपला घालणे कमीपणाचे वाटे. ते नुसत्या शर्टावर निघत तर आम्ही नुस्त्या बनीयनवर निघण्यास त्तयार असू. आजोबा कसेबसे अंगावर शर्ट चढवण्यास लावत. “चपला घालारे” असे म्हणेपर्यंत आम्ही भावंडांपाठी अनवाणी पळालेलो असू. मातीच्या कच्च्या रस्त्य़ावरील काटे-दगड बोचले तरी त्या मातीच्या स्पर्शाचे सुख अधिक मोठे होते. अंग कुडकुडत असले तरी त्या थंडी-धुक्यातून भरभर चालण्यातील मजा काही न्यारीच होती. नुकतीच पोटात गेलेली मायेची खमंग न्याहारी आतून ऊब देत असताना त्यावर ती थंडी झेलण्याचे सुख इतर कोठे कसे मिळणार?
आता कोणी सांगण्याआधी पाय़ गुमानपणॆ स्पोर्ट-शूज मध्ये शिरतात, जॅकेट अंगावर चढलेले असते. आणी मन बिचारे “ते दिवस” कुठे दिसले तर कॅमेरात पकडण्याचा असा केविलवाणा प्रयत्न करते.
खुप दिवसांनी पोस्ट टाकलीत…शाळेचे दिवस आठवले एकदम… 🙂
very nice.
man bharun ale…
shbda apure ahet sangayala.
kharach te shALECHE DIVAS PARAT YETIL KA ?
this is golden moments of the life
Swapna Bhaghu Shakto !Karan Te Divas Yeu Shaknar nahi
KUndas sillodkar…
Te Diwas Kadhich Nahi Visarnar