वर्षभर रगडून काम केल्यावर मिळालेली व्हेकेशन. भरपूर प्लॅन करून आखलेले रीलॅक्स्ड टूर शेड्युल, तरीही फोटो काढण्याचा नादामुळे कमी पडणारा वेळ. त्यामुळे एका मुक्कामावरून दुसरा गाठताना होणारी घाई. अशाच एका प्रवासात मध्यप्रदेशातील बांधवगडाकडे जाताना तसा उशीर झाला होता तरीही चहा घेण्यासाठी वाटेवरील एका टपरीवर थांबलो होतो. संध्याकाळचे चार-सव्वाचारच वाजले होते. जानेवारीचा महिना. हवेत छान गारवा होता. उतरत्या उन्हाची ऊब हवीहवीशी वाटत होती. आजुबाजुला सगळीकडे शेती व अधेमधे शेतकर्यांची घरे होती. लोक शेतावरून घराकडे परतू लागले होते. आम्ही सोडल्यास इतर कोणालाही कसलीही घाई नव्हती. सारे काही शांतपणे चालू होते.
त्या टपरी समोरील घराचे हे चित्र. घर तसे भरलेले व “वेल-टू-डू” शेतकरी कुटुंबाचे वाटत होते. दारापुढे गाई-म्हशी बांधल्या होत्या. अंगणात एक बाई लहान मुलाला “एक पाय नाचिव रे गोविंदा” म्हणत चाल चाल करत होती. दुसरी वयस्क बाई तिच्याशी गप्पा मारत बसली होती. बहुतेक सासू-सुना असाव्यात. शेतावरून येणारी बाप्येमंडळी एक एक करीत त्या आई-मुलाजवळ जमा झाली व बाळाचे कौतुक पाहू लागली. मग थोडयावेळाने काठी टेकत-टेकत आपली पांढरी स्वच्छ दाढी सांभाळत एक आजॊबा सावकाश चालत आले व त्या बाळाच्या कौतुकात सामिल झाले. काही वेळाने आजोबा त्या वयस्क बाईशी काहीतरी बोलले. तशी ती लगबगीने उठली व घरात गेली. आजोबांनी बहुतेक चहा मागितला असावा. पण एकंदरीत कारभार फारच निवांतपणे चालला होता. रोजच्या धावपळीच्या जीवनातून जे “फुरसतके रात दिन” अनुभवायला आम्ही येवढे लांब आलो होतो ते साक्षात समोर होते. बस्स, असे वाटले की तो संथपणा अंगाखांद्यावर झेलत व अंगप्रत्यंगात घोळवत येथेच बसून रहावे. पण….पण आमच्या, स्वत:च आखलेल्या, “रीलॅक्स्ड” टूर शेड्युलमध्ये ते बसत नव्हते. पटापट चहा पिऊन १०० कि.मी. वरील पुढच्या मुक्कामास काळोख पडायच्या आत पोहोचण्यास आम्ही मजबूर होतो.
रोजची धावपळ जिंकण्याच्या, प्रत्येक गोष्टीचे परफेक्ट प्लॅनिंग करण्याच्या व सतत काहीतरी अचिव्ह करण्याच्या सोसातून बाहेर पडून फुरसतीचे आयुष्य जगणे आपल्याला कघी कळेल का हो? आणी समजा कळलेच तरी ते वळेल का हो? काही कळतच नाही.