सांगा मुकुंद कुणी हा पाहिला

आठवड्याचा मधला वार. सकाळी कामाला जाताना कारमध्ये रेडिओवर आकाशवाणी एफएम गोल्ड चालू होते. मनातली मराठी गाणी. एक फरमाईश आली. अमर भूपाळी चित्रपटातील “सांगा मुकुंद कुणी हा पाहिला” या गाण्यासाठी. निवेदक मंगेश वाघमारे नेहमीप्रमाणे चित्रपट व गाण्याबद्दल अधिक माहिती देत होते. रासक्रीडेमध्ये रंगलेल्या गोपींना सोडून गुप्त झालेल्या कृष्णाला त्या गोपी भानावर आल्यावर शोधीत आहेत व आर्तपणे आळवीत आहेत त्याचे अप्रतिम वर्णन होनाजी बाळा यांनी केले आहे.

रासक्रीडा करिता वनमाळी, हो | सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी | कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे | वियोग आम्हांलागी तुझा ना साहे………

मन एकदम चाळीस वर्षे भूतकाळात गेले. सत्तराचे दशक व शाळेतील दिवस आठवले. हे गाणे व आमचे भागवत सर यांचे अतूट नाते आमच्या मनात जुळले होते.

भागवत सर आम्हाला मराठी शिकवीत. शाळेच्या वेळात कडक, पण शाळा सुटली की संध्याकाळी मुलांच्यातलेच होऊन जात. उत्तम वाचन. तल्लख विनोदबुद्धी. व गोड गाणारा गळा. स्वतः पेटी वाजवून गात असत. सरांचे घर व कुटुंब पनवेल जवळ पळस्पे गावात होते. आमची शाळा मुंबईत गिरगावात. त्यामुळे सर आठवडाभर शाळेतच रहात व आठवड्याच्या शेवटी घरी जात. शाळा सुटली की अभ्यासापेक्षा नाटक, गाणे, वाचन जास्त आवडणारी आम्ही उनाड मुले व भागवत सर यांची टीचर्स रूममध्ये मैफिल जमत असे. कधी पुस्तकांवर चर्चा, कधी नाटकाची तयारी, पण बहुतेकवेळी पेटीवर बसून गाणे व गाण्यावर चर्चा. शास्त्रीय संगीत शिकणारे इतर मित्र व सर अगदी रंगात येत असत. त्या मित्रांची तयारीही चांगलीच असे. उदाहरणच घ्यायचे तर आजचा आघाडीचा संगीतकार अनंत अमेम्बल माझ्या एक वर्ग पुढे होता. त्याचा घरातच गाणे. आणखी एक होता त्याचे वडील गाण्याचे क्लास चालवत असत व हा स्वतः मॅन्डोलीन वाजवीत असे. तबला व पेटी येणारे बरेच होते. म्हणजे तयारी काय असेल याची कल्पना करा. आम्ही नुसते कानसेन. या मैफिलीचा शेवट बहुतेक वेळा “सांगा मुकुंद कुणी हा पाहिला” या फ़र्माइशीमध्ये होत असे. सर हे गाणे अतिशय सुरेख व तल्लीन होऊन गात असत.

शाळा संपली. पुढे उपनगरात रहायला गेल्यावर गिरगाव सुद्धा सुटले. पुढची काही वर्षे हे गाणे रेडिओवर ऐकू आले की सरांची व शाळेची आठवण एवढेच राहिले. पुढे व्यवसायानिमित्त देशाबाहेर गेल्यानंतर हे गाणे रेडीओवर ऐकू येणेही थांबले.

शाळा सुटल्यानंतर तीस वर्षानी परत येऊन पुण्यात स्थायिक झालो. शाळासोबत्यांचा शोध सुरु झाला. त्यातील एक मित्र ठाकूर. पनवेल जवळ स्थायिक झाला होता. त्याचे सरांकडे अजून जाणेयेणे होते. एकदिवस त्याने सरांच्या घरूनच फोन लावला व म्हणाला, “अरे, हा आवाज ओळखतो का बघ” व फोन सरांना दिला. आवाज ऐकून मी अवाक. तीस वर्षानी मी माझ्या आवडत्या सरांचा आवाज ऐकत होतो. त्या उमलत्या वयातील मृदू आठवणी उफाळून वर आल्या व व्यवहाराने निबर झालेल्या मनाला एका क्षणात चिंब भिजवून गेल्या. डोळ्यामधून पाणी येणे तेवढे बाकी होते.

कुठे होतास, काय करतोस, बायको मुले काय करतात असे चौकशी झाल्यावर सर म्हणाले, “आता  मनसोक्त गप्पा मारायला मी पुण्याला तुझ्याकडे दोन दिवस रहायला येतो ठाकूरसोबत म्हणजे मस्त मैफिल जमवता येईल. पेटी आहे कि नाही तुझ्याकडे, का घेऊन येऊ? मी आणि ठाकूर दिवस ठरवतो व कळवतो.”

“सर आमची ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ ची फर्माईश अजून आहेच बर का”. फोन ठेवता ठेवता ठाकूर म्हणाला.

“अरे, ती कशी विसरेन” असे म्हणत सरांनी चक्क फोनवरच मुखडा गाऊन दाखवला. “बाकीचे प्रत्यक्ष  भेटीत येत्या एक दोन आठवड्यात.” असे म्हणत फोन ठेवला.

तीन चार दिवसानी ठाकूरचा फोन आला.

“कोणता दिवस ठरवलास सरांबरोबर?” माझा पहिला प्रश्न. ठाकूर काहीच बोलला नाही.

“हॅलो हॅलो…”.

थोडेसे खाकरून ठाकूर पुन्हा गप्प झाला. मग अडखळत बोलू लागला.

“कसे सांगू तुला…… सर आता येऊ शकत नाहीत……. अरे आपले सर गेले….. आजच अपघात झाला. पनवेलला त्यांच्या दुचाकीला ट्रकने पाठून उडवले…… सर ट्रकखाली आले.”

“नको, नको. तू बिलकुल येऊ नकोस. तुला पाहवणार नाही व पाहूही नकोस. सरांचा डावा डोळा, भुवई व कपाळाचा थोडा भाग सोडता बाकी काहीही चेहरा ओळखता येत नाहीए….. तू नको येउस.”

मी सुन्न.

सर गेले, पण गोपींच्या मनातील ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ ही आर्तता मात्र आमच्या हृदयात कायमची ठेऊन गेले.

DSC_1613

(वरील प्रसंग दुर्दैवाने प्रत्यक्षात घडलेला आहे)

फुरसत के रात दिन

वर्षभर रगडून काम केल्यावर मिळालेली व्हेकेशन. भरपूर प्लॅन करून आखलेले रीलॅक्स्ड टूर शेड्युल, तरीही फोटो काढण्याचा नादामुळे कमी पडणारा वेळ. त्यामुळे एका मुक्कामावरून दुसरा गाठताना होणारी घाई. अशाच एका प्रवासात मध्यप्रदेशातील बांधवगडाकडे जाताना तसा उशीर झाला होता तरीही चहा घेण्यासाठी वाटेवरील एका टपरीवर थांबलो होतो. संध्याकाळचे चार-सव्वाचारच वाजले होते. जानेवारीचा महिना. हवेत छान गारवा होता. उतरत्या उन्हाची ऊब हवीहवीशी वाटत होती. आजुबाजुला सगळीकडे शेती व अधेमधे शेतकर्‍यांची घरे होती. लोक शेतावरून घराकडे परतू लागले होते. आम्ही सोडल्यास इतर कोणालाही कसलीही घाई नव्हती. सारे काही शांतपणे चालू होते.

त्या टपरी समोरील घराचे हे चित्र. घर तसे भरलेले व “वेल-टू-डू” शेतकरी कुटुंबाचे वाटत होते. दारापुढे गाई-म्हशी बांधल्या होत्या. अंगणात एक बाई लहान मुलाला “एक पाय नाचिव रे गोविंदा” म्हणत चाल चाल करत होती. दुसरी वयस्क बाई तिच्याशी गप्पा मारत बसली होती. बहुतेक सासू-सुना असाव्यात. शेतावरून येणारी बाप्येमंडळी एक एक करीत त्या आई-मुलाजवळ जमा झाली व बाळाचे कौतुक पाहू लागली. मग थोडयावेळाने काठी टेकत-टेकत आपली पांढरी स्वच्छ दाढी सांभाळत एक आजॊबा सावकाश चालत आले व त्या बाळाच्या कौतुकात सामिल झाले. काही वेळाने आजोबा त्या वयस्क बाईशी काहीतरी बोलले. तशी ती लगबगीने उठली व घरात गेली. आजोबांनी बहुतेक चहा मागितला असावा. पण एकंदरीत कारभार फारच निवांतपणे चालला होता. रोजच्या धावपळीच्या जीवनातून जे “फुरसतके रात दिन” अनुभवायला आम्ही येवढे लांब आलो होतो ते साक्षात समोर होते. बस्स, असे वाटले की तो संथपणा अंगाखांद्यावर झेलत व अंगप्रत्यंगात घोळवत येथेच बसून रहावे. पण….पण आमच्या, स्वत:च आखलेल्या, “रीलॅक्स्ड” टूर शेड्युलमध्ये ते बसत नव्हते. पटापट चहा पिऊन १०० कि.मी. वरील पुढच्या मुक्कामास काळोख पडायच्या आत पोहोचण्यास आम्ही मजबूर होतो.

रोजची धावपळ जिंकण्याच्या, प्रत्येक गोष्टीचे परफेक्ट प्लॅनिंग करण्याच्या व सतत काहीतरी अचिव्ह करण्याच्या सोसातून बाहेर पडून फुरसतीचे आयुष्य जगणे आपल्याला कघी कळेल का हो? आणी समजा कळलेच तरी ते वळेल का हो? काही कळतच नाही.

रुसवा

आमच्या गच्चीमध्ये कबुतरे खूप येतात. त्यांचे गुटर्गू व प्रणयाराधनेचे खेळ तर बाराही महिने चालू असतात. त्यामधल्या एका क्षणाचा हा फोटो.

काय म्हणतोय तो नर त्या मादीला?

मला तर रफीने गायलेले वंदना विटणकर यांचे गाणेच आठवते आहे –

हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा, सोड ना अबोला

झुरतो तुझ्याविना, घडला काय गुन्हा

बनलो निशाना, सोड ना अबोला

मला फोटो देऊन दोन्ही कबुतरे उडून गेली. तिने रुसवा सोडला कि नाही, माहीत नाही. नसेल तर तो दुसरी मादी शोधेल व ती देखिल दुसरा नर. त्या रुसव्याला, नकाराला तेथेच सोडून जेव्हां मूड लागेल तेव्हां तो क्षण असलेल्या साथिदारासोबत मनमुराद उपभोगणारे आझाद पंछी ते, एका नकारासाठी आयुष्य वार्‍यावर उधळणार्‍या वेडया मनुष्य जमातीला नक्कीच हसत असतील.

एक तो “रामबोला”च वेगळा निघाला. माहेरी गेलेल्या बायकोला – रत्नावलीला – भेटण्यास आतुर झालेला रामबोला दोन प्रहर रात्री खिडकीला लटकणार्‍या सापाला धरून रत्नावलीच्या खोलीत शिरला. त्याचा वेडेपणा पाहुन बायकोने धिक्कारल्यावर सरळ श्रीरामाचीच साथसंगत धरली. रामबोला संत तुलसीदास झाले. आयुष्य त्यानेही उधळले पण श्रीरामांवर, आणी पक्ष्यांसारखे अलगद संसारातील जन्म-मरणाच्या फेर्‍यापलिकडे उडून गेले.

वाघाची पावले

मध्यप्रदेशातील बांधवगड हे वाघांचे अभयारण्य आहे. उन्हाळ्यामध्ये वाघ सहज दिसतात कारण ते पाण्याच्या ठिकाणी वारंवार येतात व पाण्याची ठिकाणे फार मर्यादित झालेली असतात. हिवाळ्यात वाघ दिसणे त्यामानाने अवघड असते कारण भरपूर थंडीमुळे वाघ झाडीतच रहाणे पसंत करतो व पाणीही बर्‍याच ठिकाणी असते. आम्ही जानेवारीत बांधवगडला गेलो होतो. त्यामुळे वाघ दिसणार नाहीत याची पूर्ण कल्पना होती. पण वाघ दिसावा व कॅमेर्‍यात टिपावा अशी जबरदस्त इच्छा तर होती. 

 

सफारीची सुरुवात भल्या भल्या पहाटे चार-पाच अंश सेल्सिअस तापमानात सुरू झाली. जंगलखात्याचा वाटाडया माहीती देत होता. काल अमुक येथे वाघ दिसला. या जंगलात इतके वाघ आहेत. या वाटेवर एक वाघीण व तिची चार पिले आहेत इ. इ.

आम्ही आजूबाजूची हरणे, चितळ, सांबर कॅमेरामधे टिपण्यात गुंग होतो. येवढयात समोरून एक जीप जोरात आली व जवळ येऊन थांबली. त्या जीपच्या वाटाडयाने ती वाघीण व तिचे बछडे रस्ता ओलांडून बाजूच्या झाडीत शिरताना पाहीले होते. आम्हाला ते दिसले का असे त्याने विचारले.

आम्ही नाही म्हणताच ते वाघ अजून झाडीतच होते असे सरळच अनुमान निघत होते. लगेच दोन्ही जीप वेगाने जिथे वाघ आत जाताना दिसले होते तेथे जाऊन थांबल्या.

रस्त्याचा कडेला मातीमध्ये वाघांच्या पावलांचे ताजे ठसे दिसत होतेच. तेव्हडयात समोरच्या झाडीत खुसुखुसू झाले आणी आमच्या जीपमधील एकाला वाघाचे डोके अंधुकसे दिसते आहे असे वाटले. बाकी कोणालाच काही दिसले नाही.

तो पर्यंत मागे आणखी एक दोन जीप येऊन लागल्या होत्या. अर्धा पाऊण तास थांबूनसुद्धा वाघाचे दर्शन काही झाले नाही. आता सांबाराचे कॉल (चित्कार) लांबून ऐकू आले व मग लांबवर ते सांबर जीव घेऊन पळतांना दिसले. म्हणजे वाघ नक्की लांब गेल्याची खूण होती. तेंव्हा आम्ही नुसत्या पावलांच्या ठश्यांवर समाधान मानून तेथून निघालो. 

त्या पळणार्‍या जीवाला बघताना सहज मनात आले कि आम्हीही त्या वाघांच्या तेव्हढेच जवळ होतो. समजा झालेच असते आमने सामने तर? तर आम्हा फोटोग्राफर लोकांना तर अत्यानंदच झाला असता. आम्ही काही पळालो नसतो. वाघ टिपायला तर आलो होतो. केंव्हापासून कॅमेरे सज्ज ठेवुन बसलो होतो. 

थोडे पुढे गेलो व आमच्या जीपचा एक टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी आम्हाला खाली उतरवणे भाग होते. नाहीतर जंगलात जीपच्या खाली उतरूच देत नाहीत. आता आमचा वाटाडया भयंकर टेन्स झाला. आम्ही जंगलाचे फोटो काढण्यास आजूबाजूला जाऊ लागलो कि आम्हाला धरून जीपच्या जवळ आणत होता. पुन्हा पुन्हा सांगत होता की आसपास वाघ आहेत, अजिबात कोठे हलू नका. 

क्षणात मनात आले, मगाशी जीपच्या जीवावर गमजा मारत होतो कि वाघ समोर आला पाहिजे होता. फोटो मिळाला नाही म्हणुन हळहळत होतो. आता वाघ समोर आला व अंगावर चालून आला तर? त्या सांबारासारखे पळता येणे शक्य नाही. मग, वाघाच्या तोंडी जाणे हा एकच मार्ग शिल्लक आहे हे कळल्यानंतरसुद्धा तोंडी जाता जाता त्याचे फोटो काढणे येवढी बांधिलकी तरी आपली फोटोग्राफीशी आहे का? फोटो काढताना त्या पाणिनीसारखे आम्हाला तल्लिन होता येईल का? 

पाणिनी हा इ.स.पूर्व आठव्या शतकात संस्कृत भाषेचा व्याकरणकार होऊन गेला. त्याने ऋग्वेदाची पुन:रचना केली, तसेच व्याकरणाचे संस्कृत भाषेचे नियम चौकटबद्ध केले. ‘व्याघ्र’ ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल असा विचार करत असताना नेमका त्याला सावधपणे माग हुंगत येणारा वाघ दिसला आणि त्याला व्याघ्र का म्हणतात याचा उलगडा त्याला झाला. त्या आनंदात तल्लिन होऊन “व्याजिघ्रति इति व्याघ्रः”  अशी रचना करत असतानाच त्यास वाघाने खाल्ले. अशी पाणिनीच्या मृत्यूची दंतकथा आहे. 

आणी मी स्वतःलाच टोकले “काय हौशी फोटोग्राफर, आहे का आपली येवढी कमिटमेन्ट?”

अग्निपंखी

फ्लॅमिंगो या पक्ष्याचे रोहित हे आपल्याकडचे प्रचलित नाव आहे. अग्निपंखी हे त्यामानाने कमी प्रचलित नाव. पण मला अग्निपंखी हेच नाव जास्त योग्य वाटते. का हे यापुढील फोटोमुळे कळेलच.

रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत विशिष्ट असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतीशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत. भिगवण जवळचे डिक्सळ हे गाव उजनी जलशयाच्या काठावर आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च या महिन्यात येथे रोहित पक्षी वस्तीला येतात.

या “अग्निपंखीं”च्या फोटोग्राफीसाठी केलेल्या प्रवासाचे हे चित्रवर्णन. या आधी खूप जणांनी केले आहे. मीही त्यातलाच आणखी एक. परंतु अग्निपंखीची जलक्रीडा व गगनविहार हा एक अवर्णनीय अनुभव असल्याने चित्रे जास्त व वर्णन आवश्यक तेव्हढेच ठेवणार आहे.

डिक्सळला नावाडयाशी भाव ठरवून (साधारण प्रती माणशी १००-२०० रुपये १-२ तासांसाठी) होडीने प्रयाण करेपर्यंत सूर्य बराच वर आला होता.  नावाडयाने लांब हात करून सांगितले की पक्षी या वेळी फार लांब आहेत. त्या झाडाच्याही पलिकडल्या किनार्‍यावर.

थोडयावेळाने लांबवरून येणारा एक ४०-५० रोहित पक्ष्यांचा थवा डोक्यावरून उडत गेला. नावाडी म्हणाला कि पुढे गेलेल्या काही लोकांनी आवाज करून यांना उडवले असणार. नाहीतर येवढे एकदम उडत नाहीत.

साधारण २०-२५ मिनिटे गेल्यावर आम्ही त्या जलाशयाच्या मध्येच असलेल्या एका झाडापाशी पोहोचलो. तेथून बर्‍याच लांब अंतरावर रोहीतांचा एक थवा पाण्यात जलक्रीडा करतांना दिसत होता. आजूबाजूस दोन-तीन इतर होडयाही होत्या. पण कोणताही नावाडी होडी आणखी पुढे नेण्यास तयार नव्हता. यापुढे होडी नेली तर त्या हालचालीने पक्षी पुन्हा उडून पलीकडे लांब जातील असे त्यांचे म्हणणे होते.

येवढया लांब अंतरावरून फोटो काढण्यास २५०मि.मि. रेंजची लेन्सही कमीच पडते. ३००-४०० मि.मि. तरी हवी. माझी लेन्स २०० मि.मि. ची असल्याने फोटो काढण्यावर साहजीकच मर्य़ादा पडल्या.

सकाळच्या न्याहारीत गुंतलेला हा एक थवा.


प्रणय नृत्यात दंग असलेला अग्निपंखी.

असे आम्ही रोहित दर्शनात गुंग होतो तेव्हडयात एका नावाडयाने त्याची होडी पुढे दामटली.

ती हालचाल पहाताच थव्यातील काही पक्षी पुन्हा आकाशात उडाले. त्यांनी आमच्या डोक्यावरून एक लहानशी फेरी मारली त्याचे काही फोटॊ आता पुढे येतील. पक्षी उडालेले पाहून इतर नावाडयांनी त्या पुढे जाणार्‍या नावाडयाला रोखले. पण तो पर्यंत मला अग्निपंखींच्या गगनविहाराचे छान फोटो मिळाले.

असा साधारण एक तास रोहीत निरीक्षणात काढून आम्ही परत फिरलो, पण पुन्हा पुढल्या वर्षी जास्त चांगली रेंज असलेली लेन्स घेऊन येण्याचा निश्चय करुनच.


एक झाड आणी…….

पुण्याजवळील भिगवण हे पक्षीप्रेमी लोकांमध्ये अतिशय प्रसिध्द गाव. तेथे काढलेला हा फोटो. तो पहाता पहाता “एक झाड आणी दोन पक्षी” असे शीर्षक एकदम डोळ्यांपुढे आले. 

संस्कृतमधील एका श्लोकामध्ये देह, मन व आत्मा यांचे वर्णन “एक झाड आणी दोन पक्षी” असे केले आहे. एक झाड म्हणजे आपण स्वत: आणि दोन पक्षी म्हणजे आपले मन व आत्मा. त्या श्लोकामध्ये पुढे असे वर्णन आहे की आयुष्याच्या झाडावरती असलेले हे दोन पक्षी. एक (म्हणजे मन) सर्व फळे खातो पण तरीही दु:खी व असमाधानी आहे.  दुसरा (म्हणजे आत्मा) काहीही खात नाही आणी सतत शांतपणे पहिल्याचे निरिक्षण करतो. 

जर वरील फोटोला हे शीर्षक दिले तर मग या खालच्या फोटोला काय शीर्षक द्यावे? येथे तर दोन्हीही पक्षी एकमेकांकडे पाठ फिरवून बसले आहेत. 

मला वाटते पहिल्या फोटोला “एक झाड आणी दोन पक्षी (कलियुगापूर्व्रीचे)” व दुसर्‍याला “एक झाड आणी दोन पक्षी (कलियुगातील)” म्हणावे. कलियुगातील मन फार हुशार झाले आहे. आपल्या सर्व वासनांना त्याने येवढे सोज्वळ रूप दिले आहे कि जणू प्रतिआत्माच. आणी तो आत्मा बिचारा शोधतोय की तीन युगे निरिक्षण केलेले ते काळेकुट्ट, सतत फडफडणारे मन गेले तरी कुठे?

 

मुरलीधर श्याम

वो काला एक बांसुरीवाला। सुध बिसरा गया मोरी रे॥   सुध बिसरा गया मोरी……. ॥

माखनचोर वो नंदकिशोर। कर गयो ओ s रे, कर गयो मनकी चोरी रे ।

सुध बिसरा गया मोरी……. ॥

अनुप जलोटा यांनी गायलेले हे प्रसिद्ध भजन. हे ऐकताना तो कृष्ण कसा दिसत असेल असे विचार नेहमी मनात येत असत. मग अनेक चित्रकारांनी रंगवलेला कृष्ण डोळ्यांपुढे येई. पण तो कृष्ण नीळा असे. अनेक मंदिरामधील कृष्णाच्या मुर्ती तर संगमरवरी असतात. मग काळा कृष्ण कसा दिसत असेल ते काही मनापुढे स्पष्टपणे येत नसे.

गेल्या आठवडयात कर्नाटकातील प्रसिद्ध बेल्लुर मंदिरात जाण्याचा योग आला. बेल्लुर येथील प्रमुख मंदिर चन्नकेशवाचे आहे. त्या बाजुलाच एक महाविष्णुचे मंदिर आहे. आत शिरल्यावर मुख्य सभागृहाच्या डाव्या उजव्या अंगाला अनेक छोटया देवदेवतांच्या खोल्या किंवा गाभारे आहेत. त्यातील एका खोलीत हा कृष्ण लपला होता. तो दिसला आणि माझ्या मनाने एकदम तान छेडली – वो काला एक बांसुरीवाला – आणि मग माझी अवस्था काही क्षण – सुध बिसरा गया मोरी रे – अशीच झाली.

ठेंगणी ठुसकी कृष्ण दगडातील कृष्ण-मुर्ती एका काळ्या गोल दगडावर उभी होती. अगदी आपला पंढरपूरचा पांडुरंग जसा विटेवर उभा आहे तशीच. तो विठोबा देखिल कर्नाटकातून नाव बदलून महाराष्ट्रात आलेला कृष्णच आहे म्हणे – ‘कानडाउ विठ्ठलु करनाटकु तेणे मज लावियेला वेधु’.  पुंडलिकासाठी विटेवर वाट बघत उभा राहिलेला विठोबा तो. नाव-गाव बदलले तरी सवयी नाही बदलल्या. तसाच विटेवर उभा, भक्तांची वाट बघत. बहुतेक त्या मोठयाचेच हे लहानपणचे रूप असावे. जरीकाठाचे रेशमी धोतर नेसवलेला. डावा पाय सरळ व उजवा थोडा वाकवलेला. ओठावरील बासरीचा नाद अंगांगात भरवून जणू डोलत असलेला. कपाळभर गंध  व या सर्वांच्या पलिकडचे त्याचे जादुभरे कमल-नयन. ते तुमच्यावर कधी गारुड करुन जातात काही कळतच नाही. आज आठवडा उलटला तरी ते गारुड काही अजून उतरले नाहीये व उतरावे अशी इच्छाही नाही.

माझ्या मनाची आक्रंदने मात्र म्हणताहेत……

 छुप गयो फिर एक तान सुना के, कहां गयो एक बाण चला के ॥

गोकुल ढुन्ढा मैने मथुरा ढुंढी, कोइ नगरीया ना छोडी रे….

…..सुध बिसरा गया मोरी॥

मुग्धा

आत्ताच आम्ही मध्यप्रदेशाची सहल करून आलो. जबलपूर – खजुराहो – बान्धवगड – अमरकंटक – कान्हा – जबलपूर असा १३०० कि.मि.चा प्रवास केला. त्या प्रवासाची शब्दचित्रे इंग्रजीमधून http://fromperiphery.wordpress.com/  या माझ्या संकेतस्थळावर प्रकाशित करणे सुरू केले आहे. परंतू काही गोष्टी मायबोलीतच व्यक्त करता येतात. त्यापैकी ही एक.

प्रवासात दर दोन-तीन तासांनी चहापाण्यासाठी आम्ही थांबत असू – बहुतेकवेळी रस्त्याकडेच्या टपरीवरच. बर्‍याचशा टपर्‍या म्हणजे पाठी घर व पुढे चहाचे दुकान अशाच असत. चहासुद्धा ‍‌आँ‍र्डर दिल्यावर मगच टाकला जात असे. अशाच एका ठिकाणी टपरीवाल्याची लहान मुले आजुबाजूला भोवती फिरत होती. नेहमीप्रमाणे चहा तयार होईपर्यंत मी त्या छोटया मुलांचे फोटो काढू लागलो. अशा ठिकाणी पोर्टेट नेहमीच छान मिळतात. एकदोन फोटो पाहिल्यावर ती मुलेही पुढेपुढे करत होती.

ही थॊडी वयात आलेली मुलगी जरा बाजूलाच उभी होती. मी काही तिच्याकडे फार लक्ष दिले नाही. चहा तयार झाल्यावर मी कॅमेरा बॅगेत ठेऊ लागलो तशी माझी बायको म्हणाली “अरे, तिचा एक तरी फोटो काढ. जरा बघ तरी ती कितीवेळ वाट बघत तशीच लाजत उभी आहे”.  हा तो फोटो, त्या लाजर्‍या मुलीचा.

फोटो पाहताक्षणी सर्वांनी एकच शब्द उच्चारला – मुग्धा.

मुग्धा. नाजूक अर्थाचे अतिशय गोड नाव. संस्कृतमध्ये मुग्धा म्हणजे लाजरी, बावरलेली, अननुभवी, कोवळी, नुकतीच वयात आलेली बालिका. अशा या बालिकेचे हे गोड छायाचित्र.

सकाळी रंगलेला मारुबिहाग

मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. आमचे एक नातेवाईक एका प्रतिथयश शाळेचे मुख्याध्यापक होते. वाचन उत्तम. विविध कलांबद्दल त्यांना चांगली महिती होती. जनसंपर्कही तेवढाच चांगला. भाषेवर उत्तम प्रभुत्व. अतिशय गोष्टीवेल्हाळ माणूस. त्यामुळे आम्ही मुले त्यांचा शब्द म्हणजे अगदी ब्रम्हवाक्य समजत असू. मोठया माणसांच्या गप्पांमध्येदेखिल ते काय बोलत आहेत हे कान देऊन ऐकत असू. 

एकदा मोठया माणसांमध्ये हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीताविषयी चर्चा चालू होती – कोणता राग कधी आळवावा याची. मुख्याध्यापक त्यांच्या सतार शिकणार्‍या होतकरू शेजार्‍याची गोष्ट सांगू लागले. यांच्या घरी एक मोठ्ठे गायक आले असतांना त्या शेजार्‍याने त्यांना बळेच सतार ऐकवण्याचा आग्रह धरला. सकाळचे आठ वाजले होते व तो मारुबिहागचे सूर छेडू लागला. त्या गायकांनी त्यास तेथेच थांबवले व अतिशय तुटकपणे म्हणाले, “रवीशंकर हा राग फक्त सायंकाळनंतर वाजवतात, तेंव्हा आपण हा राग ज्यावेळी सायंकाळनंतर वाजवण्यास शिकाल त्यावेळी मी ऐकण्यास येईन.” 

मला तेंव्हा त्या गायकांचा खूप राग आला. त्या शिकणार्‍याला जर सकाळचा रागच अजून शिकवला नसेल तर त्याने काय वाजवून दाखवावे? पण तात्पर्य पक्के डोक्यात बसले – प्रत्येक रागाच्या ठराविक वेळा असतात व ते राग तेंव्हाच गायचे वाजवायचे असतात. मारुबिहाग हा तर संध्याकाळनंतरच गायचा असतो नाहीतर गोहत्येपेक्षा मोठे पातक लागते असाही एक समज त्या लहान वयात झाला होता. (पण मग मध्यरात्रीचे राग हे गुरू मध्यरात्रीतच शिकवतात का, हा प्रश्न मात्र आजतागायत अनुत्तरीतच राहीला होता.) 

पुण्याच्या आमच्या इमारतीत सर्वच हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतात जाणकार आहेत. यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. नसते तरच आश्चर्य. वर्षानुवर्षे सवाई ऐकून कोणाचे कान तयार होणार नाहीत? पण आमच्या समोरच्या सदनिकेत एक काका रहातात. ते उत्तम गातात. नोकरी करीत असतांना अतिशय कष्ट घेऊन रियाज चालू ठेवला. हल्लीच सेवानिबृत्त झाले आहेत व आता पूर्णवेळ गाण्यास देत आहेत. त्यांचा आवाज कमावलेला व बुलंद आहे. रियाज़ करतांना मोकळ्या गळ्याने (म्हणजे full throated बरं का) गातात. व वारा वाहता राहण्यासाठी सदनिकेचे दार उघडेच ठेवतात. सोसायटीत सर्वांना ऐकू येतो त्यांचा रियाज व त्यांना प्रतिक्रियाही लगेच मिळतात. आमचा प्रत्येक दिवस त्यामुळे तोडी, भटीयार, ललत इ. च्या तालावर सुरु होतो व यमन, कल्याण, बागेश्री, भैरवीचे आलाप घेत रात्र सुरेल करीत लयास जातो. 

आज शनिवार. काल रात्री TV वर late night action movie पाहुन झोपी गेलो होतो. आज डोळे उघडता उघडता कानी काकांचे सूर पडले – “रसिया आओ ना sssss”. अरे ! हा तर मारुबिहाग. काका तब्बेतीत गात होते. आवाज छान लागला होता. म्हणजे रात्रच आहे. झोप लागली आहे असा भासच झाला वाटते. मग हा येव्हढा उजेड कसला? आडवे होतांना Tube light बंद करण्यास विसरलो असे वाटून ताडकन उठलो. पहातो तो खरच शनिवार उजाडला होता. आणी…..आणी काका मारुबिहागच गात होते. मला लगेच मुख्याध्यापकांचा वरचा प्रसंग आठवला. ते गायक आज येथे रहात असते तर काकांचे भविष्य काही खरे नव्हते असा विचार करून मनाशीच हासू आले. पण तरीही मारुबिहागची सकाळी सकाळी मझा घेत दात घासणे, चहा पिणे झाले. पेपर वाचता वाचता काकांचे मारुबिहाग आळवणे मध्येच कधी थांबले हे कळलेच नाही.

बाकी आटपता आटपता आठ वाजले आणी लाईट गेले. आता निदान अर्ध्या तासाची निश्चिंती म्हणून गाडी पुसण्यास बादली व फडके घेऊन खाली उतरलो. गाडीवर पाणी मारून होते न होते तेवढयात पाठीमागून काका लुंगी सावरत सावरत पिशवी घेऊन खाली उतरतांना दिसले. बहुतेक काकींनी वाण्याकडॆ धाडले असावे. अगदी राहवले नाही तेंव्हा म्हणालो, “काका राग मस्त जमला होता, मूड मस्त केलात – रसिया आओ ना – क्या बात है.” काका खूष झाले. मग अगदीच राहवले नाही तेंव्हा मनातील मळमळ मोकळी केली. “काका मारुबिहागच गात होतात ना? सकाळी कसा?” 

गेटपर्यंत पोहोचलेले काका एकदम थांबले व गर्रकन मागे फिरले. त्यांच्या चेहर्‍यावर एक प्रसन्न भाव होता. मला हुश्श वाटले. काकांना राग नव्हता आला. 

ते म्हणाले, “अरे तुला मारुबिहागची गम्मत सांगतो. अमुक अमुक घराण्यात तो असा गातात”……काकांनी गाऊन दाखविले. “पण माझे गुरू तो असा गात असत”……पुन्हा काकांचे गाणे सुरु. 

काय दृष्य होते ते. अर्ध्या चड्डीतला मी ओल्या फडक्याने गाडी पुसतोय. काका लुंगीत बाजुला उभे व रंगात येउन गात आहेत. तो देखिल मारुबिहाग. “रसिया आओ ना”. सकाळी सकाळी. हातात वाणसामानाची पिशवी घेऊन. 

पुढे ते म्हणाले, “काल रात्री काही केल्या माझे सूर गुरूंच्या शिकवणीप्रमाणे येत नव्हते. सूर डोळ्यांसमोर नाचत होते पण गळा काही साथ देत नव्हता. शेवटी अतिशय नाराज होऊन झोपलो. पण पहाटे डोळे उघडण्याआधी गळा हवे ते सूर छेडीत होता. मग वेळेचा काय संबंध? अरे, हे सुरांचे राज्य आहे. ते राजी असतील तेव्हांच काय ते खरे. सूर जुळले की वेळेचे काय चालते त्यांच्यापुढे?” 

काका आता त्या रागातील खाचाखोचा समजाऊन सांगत होते, मनापासून गात होते. गाडया पुसणारे आमची इतर रसिक शेजारीही आता भोवती गोळा झाले व मारुबिहागची मजा घेऊ लागले. दिवसाची कुठली वेळ आहे याचे भान आम्हा कोणालाही उरले नव्हते. 

“अहॊ, आधी पोहे आणी वाणसामान घेउन या. मग मैफ़ल जमवा घरातच. बोलवा सगळ्यांना. कांदेपोहे करते सर्वांसाठी”. काकींनी वरच्या मजल्यावरून हाळी दिली आणी काकांना आपण कशासाठी खाली उतरलो आहोत याचे भान आले. काकांनी मग आवरते घेतले आणी आम्हीही आपापली कामे पूर्ण करण्यास पांगलो, मारुबिहागाचे सूर मनात घोळवत, सकाळची वेळ असुनही. 

एक सत्य आज अचानक समोर ठाकले होते. हे सुरांचे राज्य आहे. ते राजी असतील तेव्हांच काय ते खरे. सूर जुळले की वेळेचे काय चालते त्यांच्यापुढे?

पणत्यांची आरास

दिवाळीच्या दिवसात घरात न रहाण्याचा रिवाज या वर्षी पाळता आला नाही. प्रथम व्यवसायानिमित्त देशाबाहेर रहाणे झाले. मग परत आल्यावर तीन-चार कुटुंबातील लहान-मोठया सर्वांना सुट्टी मिळून एकत्र भारतदर्शन करण्यास हे दिवस बरे असतात असे जाणवल्यामुळे दिवाळीची सुट्टी घराबाहेर असेच समीकरण झाले होते. या वर्षी Swine-Flue देवतेच्या कृपेने मुलांच्या सुट्या कधीच संपल्या व आम्ही पुण्यातच होतो. मुंबईहून पुण्यात नुकतेच स्थलांतरीत झालो असल्यामुळे आम्हाला हे शहर नविनच होते. ’तेथे’ हरवलेली मराठी संस्कृती येथे ठायीठायी भेटत होती. मग कोणीतरी सांगितले की दिवाळीच्या दिवसात पहाटॆ पुण्यात सारसबागेत पणत्यांची आरास करतात. लगेच आमच्या फोटो काढण्यास आसुसलेल्या स्वार्‍या सज्ज झाल्या.

पहाटे साडेपाचला निघण्याचा हुकुम गृहमंत्र्यांनी जारी केला होता त्यावेळेबरहुकुम प्रस्थान केले. जसजशी सारसबाग जवळ येऊ लागली तसतसे रस्त्यालगतचे पार्किंग फुल्ल दिसू लागले. जरा आश्चर्यच वाटू लागले. पुण्यात येवढया लौकर हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे पहिला मोकळा slot मिळल्यावर गाडी पार्क करून पायउतार झालो. थोडे पुढे गेल्यावर महालक्ष्मीच्या मंदिराचा कळस दिसला. देवीचे दर्शन घेऊन पुढे जावे असा विचार करित होतो. पण दाराबाहेरील भलीमोठी रांग पाहून पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. विचार रद्द केला. बाहेरूनच हात जोडले व सारसबागेकडे मोर्चा वळवला.

सारसबागेच्या दारापासून गर्दी तर होतीच. अगदी “सवाई गंधर्व”ला रमणबागेत असते तशी. रेटारेटी नाही पण जरा थोडे जास्त इकडॆतिकडे हलले तर कोणाला तरी धक्का लागेल येवढी. जवळूनच स्पिकर्स टेस्ट केल्याचा आवाजही येत होता. तरुणाईच्या जोडीने बुजुर्गही तेवढेच होते. सर्वचजण सणाचे ठेवणीचे कपडे घालून सजले होते. कदाचित म्हणूनच बुजुर्गही तरुणच दिसत होते. ती तरुणाई अंगावर झेलत झेलत तळ्यातील गणपतीच्या कमानीतून आत शिरलो. मंदिराभोवताली खरच पणत्यांची व रांगोळ्यांची आरास मांडली होती. माझा कॅमेरा आता “सुटला” होता.

आत गाभार्‍यात श्रींचे अभ्यंगस्नान चालू होते. अतिशय देखणी उजव्या सोंडेची मूर्ती आहे. “कृपया मूर्तीचे फोटो काढू नये” असे बोर्ड दिसल्यामुळे कॅमेरा म्यान केला व श्रींना मनसोक्त मनात साठवून घेतले. मग पुन्हा रांगोळ्यांचे फोटो काढण्यास बाहेर पडलो.

भोवताली लावलेल्या पणत्या वा‍र्‍यामुळे विझत होत्या. एक पणती विझली कि ती पुन्हा चेतवण्यास दहा हात पुढे सरसावत होते व सर्व दिवे तेवते ठेवत होते. ते पाहून मन आत कुठेतरी हलत होते, डोलत होते व आतली पणती चेतवत होते.

आता देवळातून बाहेर पडून सारस बागेतील तळ्यात फुललेली कमळे टिपत टिपत पुढे सरत होतो.

अचानक बासरीचे सूर व जोडीने सतारीची दिडदा दिडदा ऐकू येऊ लागली.

Amit Kakade (Flute) & Prasad Gondkar (Sitar)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रायोजित कार्यक्रमाची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली होती. बरेच लोक उपस्थित होते. मनापासून दाद देत होते.

Babasaheb Purandare & Mangesh Tendulkar

सकाळच्या रागांनंतर “घनःश्याम सुंदरा”चे स्वर बासरी व सतारीवर आळवले जाऊ लागले. पाखरे आपापली घरटी सोडून आकाशात झेपावली होती.

पूर्वॆला उषेचा रक्तिमा पसरला होता व मन्दिराच्या दारात आता भाविकांची दाटी झाली होती.

आमची पाऊले दिवाळीच्या फराळावर आडवा हात मारायला परत फिरली, मनात कुठेतरी हरवलीशी वाटणारी लहानपणीची दिवाळी पुन्हा एकदा भेटल्याचे समाधान घेऊन.