सांगा मुकुंद कुणी हा पाहिला

आठवड्याचा मधला वार. सकाळी कामाला जाताना कारमध्ये रेडिओवर आकाशवाणी एफएम गोल्ड चालू होते. मनातली मराठी गाणी. एक फरमाईश आली. अमर भूपाळी चित्रपटातील “सांगा मुकुंद कुणी हा पाहिला” या गाण्यासाठी. निवेदक मंगेश वाघमारे नेहमीप्रमाणे चित्रपट व गाण्याबद्दल अधिक माहिती देत होते. रासक्रीडेमध्ये रंगलेल्या गोपींना सोडून गुप्त झालेल्या कृष्णाला त्या गोपी भानावर आल्यावर शोधीत आहेत व आर्तपणे आळवीत आहेत त्याचे अप्रतिम वर्णन होनाजी बाळा यांनी केले आहे.

रासक्रीडा करिता वनमाळी, हो | सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी | कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे | वियोग आम्हांलागी तुझा ना साहे………

मन एकदम चाळीस वर्षे भूतकाळात गेले. सत्तराचे दशक व शाळेतील दिवस आठवले. हे गाणे व आमचे भागवत सर यांचे अतूट नाते आमच्या मनात जुळले होते.

भागवत सर आम्हाला मराठी शिकवीत. शाळेच्या वेळात कडक, पण शाळा सुटली की संध्याकाळी मुलांच्यातलेच होऊन जात. उत्तम वाचन. तल्लख विनोदबुद्धी. व गोड गाणारा गळा. स्वतः पेटी वाजवून गात असत. सरांचे घर व कुटुंब पनवेल जवळ पळस्पे गावात होते. आमची शाळा मुंबईत गिरगावात. त्यामुळे सर आठवडाभर शाळेतच रहात व आठवड्याच्या शेवटी घरी जात. शाळा सुटली की अभ्यासापेक्षा नाटक, गाणे, वाचन जास्त आवडणारी आम्ही उनाड मुले व भागवत सर यांची टीचर्स रूममध्ये मैफिल जमत असे. कधी पुस्तकांवर चर्चा, कधी नाटकाची तयारी, पण बहुतेकवेळी पेटीवर बसून गाणे व गाण्यावर चर्चा. शास्त्रीय संगीत शिकणारे इतर मित्र व सर अगदी रंगात येत असत. त्या मित्रांची तयारीही चांगलीच असे. उदाहरणच घ्यायचे तर आजचा आघाडीचा संगीतकार अनंत अमेम्बल माझ्या एक वर्ग पुढे होता. त्याचा घरातच गाणे. आणखी एक होता त्याचे वडील गाण्याचे क्लास चालवत असत व हा स्वतः मॅन्डोलीन वाजवीत असे. तबला व पेटी येणारे बरेच होते. म्हणजे तयारी काय असेल याची कल्पना करा. आम्ही नुसते कानसेन. या मैफिलीचा शेवट बहुतेक वेळा “सांगा मुकुंद कुणी हा पाहिला” या फ़र्माइशीमध्ये होत असे. सर हे गाणे अतिशय सुरेख व तल्लीन होऊन गात असत.

शाळा संपली. पुढे उपनगरात रहायला गेल्यावर गिरगाव सुद्धा सुटले. पुढची काही वर्षे हे गाणे रेडिओवर ऐकू आले की सरांची व शाळेची आठवण एवढेच राहिले. पुढे व्यवसायानिमित्त देशाबाहेर गेल्यानंतर हे गाणे रेडीओवर ऐकू येणेही थांबले.

शाळा सुटल्यानंतर तीस वर्षानी परत येऊन पुण्यात स्थायिक झालो. शाळासोबत्यांचा शोध सुरु झाला. त्यातील एक मित्र ठाकूर. पनवेल जवळ स्थायिक झाला होता. त्याचे सरांकडे अजून जाणेयेणे होते. एकदिवस त्याने सरांच्या घरूनच फोन लावला व म्हणाला, “अरे, हा आवाज ओळखतो का बघ” व फोन सरांना दिला. आवाज ऐकून मी अवाक. तीस वर्षानी मी माझ्या आवडत्या सरांचा आवाज ऐकत होतो. त्या उमलत्या वयातील मृदू आठवणी उफाळून वर आल्या व व्यवहाराने निबर झालेल्या मनाला एका क्षणात चिंब भिजवून गेल्या. डोळ्यामधून पाणी येणे तेवढे बाकी होते.

कुठे होतास, काय करतोस, बायको मुले काय करतात असे चौकशी झाल्यावर सर म्हणाले, “आता  मनसोक्त गप्पा मारायला मी पुण्याला तुझ्याकडे दोन दिवस रहायला येतो ठाकूरसोबत म्हणजे मस्त मैफिल जमवता येईल. पेटी आहे कि नाही तुझ्याकडे, का घेऊन येऊ? मी आणि ठाकूर दिवस ठरवतो व कळवतो.”

“सर आमची ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ ची फर्माईश अजून आहेच बर का”. फोन ठेवता ठेवता ठाकूर म्हणाला.

“अरे, ती कशी विसरेन” असे म्हणत सरांनी चक्क फोनवरच मुखडा गाऊन दाखवला. “बाकीचे प्रत्यक्ष  भेटीत येत्या एक दोन आठवड्यात.” असे म्हणत फोन ठेवला.

तीन चार दिवसानी ठाकूरचा फोन आला.

“कोणता दिवस ठरवलास सरांबरोबर?” माझा पहिला प्रश्न. ठाकूर काहीच बोलला नाही.

“हॅलो हॅलो…”.

थोडेसे खाकरून ठाकूर पुन्हा गप्प झाला. मग अडखळत बोलू लागला.

“कसे सांगू तुला…… सर आता येऊ शकत नाहीत……. अरे आपले सर गेले….. आजच अपघात झाला. पनवेलला त्यांच्या दुचाकीला ट्रकने पाठून उडवले…… सर ट्रकखाली आले.”

“नको, नको. तू बिलकुल येऊ नकोस. तुला पाहवणार नाही व पाहूही नकोस. सरांचा डावा डोळा, भुवई व कपाळाचा थोडा भाग सोडता बाकी काहीही चेहरा ओळखता येत नाहीए….. तू नको येउस.”

मी सुन्न.

सर गेले, पण गोपींच्या मनातील ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ ही आर्तता मात्र आमच्या हृदयात कायमची ठेऊन गेले.

DSC_1613

(वरील प्रसंग दुर्दैवाने प्रत्यक्षात घडलेला आहे)

ते दिवस

पुण्याजवळच्या पौड गावाकडे जाताना हा फोटो काढला. सूर्योदयापूर्वीची वेळ होती. रस्त्यावर अजून धुके होते. समोरुन शाळेत निघालेली ही मुले दिसली. बाकी गणवेष पूर्ण परंतू अनवाणी. चेहरे मात्र ताजेतवाने.  हे सर्व वातावरण माझ्या मनाला माझ्या शाळेच्या दिवसात घेऊन गेले.

दिवाळीची सुट्टी झाली कि लगेच आजोबा आम्हा भावंडांना घेऊन गावाला जायचे. शहरी शाळांना सुट्टी लागली तरी गावाकडच्या शाळा मात्र एकदोन आठवडे जास्त चालू असत. त्यांना म्हणे पावसाळ्यात जास्त सुट्टी असे व दिवाळीत कमी. सकाळी अशीच मस्त थंडी व धुके असे. लाकडे पेटवून घंगाळात गरम केलेल्या पाण्याने आंघोळ झाली कि मग लगेच न्याहारी चुलीवरच्या पिठलं-भाकरीची. शहरात गळ्याखाली न उतरणारी गँस वर केलेली भाकरी गावाला चुलीवरुन उतरली की कधी पोटात पोचते हे कळायचे देखील नाही. पिठल्यासारखे दुसरे पक्वान्न जगात दुसरे कुठले असूच शकत नाही याची पुन्हा एकदा खात्री व्हायची. मग भावंडांची शाळेत निघण्याची लगबग सुरू होत असे. चुलत भावंडे सकाळी शाळेत निघाली की आम्हीसुद्धा उडया मारत त्यांच्या बरोबर शाळेपर्यंत एक-दोन किलोमीटर जात असू. ते अनवाणी निघाले की आम्हालाही चपला घालणे कमीपणाचे वाटे. ते नुसत्या शर्टावर निघत तर आम्ही नुस्त्या बनीयनवर निघण्यास त्तयार असू. आजोबा कसेबसे अंगावर शर्ट चढवण्यास लावत. “चपला घालारे” असे म्हणेपर्यंत आम्ही भावंडांपाठी अनवाणी पळालेलो असू. मातीच्या कच्च्या रस्त्य़ावरील काटे-दगड बोचले तरी त्या मातीच्या स्पर्शाचे सुख अधिक मोठे होते. अंग कुडकुडत असले तरी त्या थंडी-धुक्यातून भरभर चालण्यातील मजा काही न्यारीच होती. नुकतीच पोटात गेलेली मायेची खमंग न्याहारी आतून ऊब देत असताना त्यावर ती थंडी झेलण्याचे सुख इतर कोठे कसे मिळणार?

आता कोणी सांगण्याआधी पाय़ गुमानपणॆ स्पोर्ट-शूज मध्ये शिरतात, जॅकेट अंगावर चढलेले असते. आणी मन बिचारे “ते दिवस” कुठे दिसले तर कॅमेरात पकडण्याचा असा केविलवाणा प्रयत्न करते.