मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. आमचे एक नातेवाईक एका प्रतिथयश शाळेचे मुख्याध्यापक होते. वाचन उत्तम. विविध कलांबद्दल त्यांना चांगली महिती होती. जनसंपर्कही तेवढाच चांगला. भाषेवर उत्तम प्रभुत्व. अतिशय गोष्टीवेल्हाळ माणूस. त्यामुळे आम्ही मुले त्यांचा शब्द म्हणजे अगदी ब्रम्हवाक्य समजत असू. मोठया माणसांच्या गप्पांमध्येदेखिल ते काय बोलत आहेत हे कान देऊन ऐकत असू.
एकदा मोठया माणसांमध्ये हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीताविषयी चर्चा चालू होती – कोणता राग कधी आळवावा याची. मुख्याध्यापक त्यांच्या सतार शिकणार्या होतकरू शेजार्याची गोष्ट सांगू लागले. यांच्या घरी एक मोठ्ठे गायक आले असतांना त्या शेजार्याने त्यांना बळेच सतार ऐकवण्याचा आग्रह धरला. सकाळचे आठ वाजले होते व तो मारुबिहागचे सूर छेडू लागला. त्या गायकांनी त्यास तेथेच थांबवले व अतिशय तुटकपणे म्हणाले, “रवीशंकर हा राग फक्त सायंकाळनंतर वाजवतात, तेंव्हा आपण हा राग ज्यावेळी सायंकाळनंतर वाजवण्यास शिकाल त्यावेळी मी ऐकण्यास येईन.”
मला तेंव्हा त्या गायकांचा खूप राग आला. त्या शिकणार्याला जर सकाळचा रागच अजून शिकवला नसेल तर त्याने काय वाजवून दाखवावे? पण तात्पर्य पक्के डोक्यात बसले – प्रत्येक रागाच्या ठराविक वेळा असतात व ते राग तेंव्हाच गायचे वाजवायचे असतात. मारुबिहाग हा तर संध्याकाळनंतरच गायचा असतो नाहीतर गोहत्येपेक्षा मोठे पातक लागते असाही एक समज त्या लहान वयात झाला होता. (पण मग मध्यरात्रीचे राग हे गुरू मध्यरात्रीतच शिकवतात का, हा प्रश्न मात्र आजतागायत अनुत्तरीतच राहीला होता.)
पुण्याच्या आमच्या इमारतीत सर्वच हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतात जाणकार आहेत. यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. नसते तरच आश्चर्य. वर्षानुवर्षे सवाई ऐकून कोणाचे कान तयार होणार नाहीत? पण आमच्या समोरच्या सदनिकेत एक काका रहातात. ते उत्तम गातात. नोकरी करीत असतांना अतिशय कष्ट घेऊन रियाज चालू ठेवला. हल्लीच सेवानिबृत्त झाले आहेत व आता पूर्णवेळ गाण्यास देत आहेत. त्यांचा आवाज कमावलेला व बुलंद आहे. रियाज़ करतांना मोकळ्या गळ्याने (म्हणजे full throated बरं का) गातात. व वारा वाहता राहण्यासाठी सदनिकेचे दार उघडेच ठेवतात. सोसायटीत सर्वांना ऐकू येतो त्यांचा रियाज व त्यांना प्रतिक्रियाही लगेच मिळतात. आमचा प्रत्येक दिवस त्यामुळे तोडी, भटीयार, ललत इ. च्या तालावर सुरु होतो व यमन, कल्याण, बागेश्री, भैरवीचे आलाप घेत रात्र सुरेल करीत लयास जातो.
आज शनिवार. काल रात्री TV वर late night action movie पाहुन झोपी गेलो होतो. आज डोळे उघडता उघडता कानी काकांचे सूर पडले – “रसिया आओ ना sssss”. अरे ! हा तर मारुबिहाग. काका तब्बेतीत गात होते. आवाज छान लागला होता. म्हणजे रात्रच आहे. झोप लागली आहे असा भासच झाला वाटते. मग हा येव्हढा उजेड कसला? आडवे होतांना Tube light बंद करण्यास विसरलो असे वाटून ताडकन उठलो. पहातो तो खरच शनिवार उजाडला होता. आणी…..आणी काका मारुबिहागच गात होते. मला लगेच मुख्याध्यापकांचा वरचा प्रसंग आठवला. ते गायक आज येथे रहात असते तर काकांचे भविष्य काही खरे नव्हते असा विचार करून मनाशीच हासू आले. पण तरीही मारुबिहागची सकाळी सकाळी मझा घेत दात घासणे, चहा पिणे झाले. पेपर वाचता वाचता काकांचे मारुबिहाग आळवणे मध्येच कधी थांबले हे कळलेच नाही.
बाकी आटपता आटपता आठ वाजले आणी लाईट गेले. आता निदान अर्ध्या तासाची निश्चिंती म्हणून गाडी पुसण्यास बादली व फडके घेऊन खाली उतरलो. गाडीवर पाणी मारून होते न होते तेवढयात पाठीमागून काका लुंगी सावरत सावरत पिशवी घेऊन खाली उतरतांना दिसले. बहुतेक काकींनी वाण्याकडॆ धाडले असावे. अगदी राहवले नाही तेंव्हा म्हणालो, “काका राग मस्त जमला होता, मूड मस्त केलात – रसिया आओ ना – क्या बात है.” काका खूष झाले. मग अगदीच राहवले नाही तेंव्हा मनातील मळमळ मोकळी केली. “काका मारुबिहागच गात होतात ना? सकाळी कसा?”
गेटपर्यंत पोहोचलेले काका एकदम थांबले व गर्रकन मागे फिरले. त्यांच्या चेहर्यावर एक प्रसन्न भाव होता. मला हुश्श वाटले. काकांना राग नव्हता आला.
ते म्हणाले, “अरे तुला मारुबिहागची गम्मत सांगतो. अमुक अमुक घराण्यात तो असा गातात”……काकांनी गाऊन दाखविले. “पण माझे गुरू तो असा गात असत”……पुन्हा काकांचे गाणे सुरु.
काय दृष्य होते ते. अर्ध्या चड्डीतला मी ओल्या फडक्याने गाडी पुसतोय. काका लुंगीत बाजुला उभे व रंगात येउन गात आहेत. तो देखिल मारुबिहाग. “रसिया आओ ना”. सकाळी सकाळी. हातात वाणसामानाची पिशवी घेऊन.
पुढे ते म्हणाले, “काल रात्री काही केल्या माझे सूर गुरूंच्या शिकवणीप्रमाणे येत नव्हते. सूर डोळ्यांसमोर नाचत होते पण गळा काही साथ देत नव्हता. शेवटी अतिशय नाराज होऊन झोपलो. पण पहाटे डोळे उघडण्याआधी गळा हवे ते सूर छेडीत होता. मग वेळेचा काय संबंध? अरे, हे सुरांचे राज्य आहे. ते राजी असतील तेव्हांच काय ते खरे. सूर जुळले की वेळेचे काय चालते त्यांच्यापुढे?”
काका आता त्या रागातील खाचाखोचा समजाऊन सांगत होते, मनापासून गात होते. गाडया पुसणारे आमची इतर रसिक शेजारीही आता भोवती गोळा झाले व मारुबिहागची मजा घेऊ लागले. दिवसाची कुठली वेळ आहे याचे भान आम्हा कोणालाही उरले नव्हते.
“अहॊ, आधी पोहे आणी वाणसामान घेउन या. मग मैफ़ल जमवा घरातच. बोलवा सगळ्यांना. कांदेपोहे करते सर्वांसाठी”. काकींनी वरच्या मजल्यावरून हाळी दिली आणी काकांना आपण कशासाठी खाली उतरलो आहोत याचे भान आले. काकांनी मग आवरते घेतले आणी आम्हीही आपापली कामे पूर्ण करण्यास पांगलो, मारुबिहागाचे सूर मनात घोळवत, सकाळची वेळ असुनही.
एक सत्य आज अचानक समोर ठाकले होते. हे सुरांचे राज्य आहे. ते राजी असतील तेव्हांच काय ते खरे. सूर जुळले की वेळेचे काय चालते त्यांच्यापुढे?